Take a fresh look at your lifestyle.

‘आत्मा’अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आता ‘ग्रुप इन्शुरन्स’ योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत विविध पदांच्या समायोजनाबाबत इतर राज्यात काय कार्यवाही करण्यात आली आहे, हंगामी पदावर कार्यरत असताना त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राबविण्यात आलेल्या कार्यप्रणालीची माहिती घेऊन त्याप्रमाणे राज्यातील आत्मा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेता येईल का, हे तपासावे, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला दिले. आत्मा अंतर्गत या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना राबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यासंदर्भात मंत्रालयात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत आत्मा अंतर्गत कार्यरत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, संगणक आज्ञावली रुपरेषक यांच्या समायोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, आत्माचे प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

केंद्रपुरस्कृत कृषि विस्तार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी आत्मा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी कंत्राटी पदावर विविध पदांची भरती करण्यात आली. सध्या राज्यात 1 हजार 582 मंजूर पदे होती. त्यापैकी केवळ 574 पदे सध्या भरली गेली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वतीने मानधन वाढविण्याची आणि समायोजन करण्याची मागणी होती. मात्र, थेट सेवाभरती नियम आणि अटी लक्षात घेता ही कार्यवाही करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याबाबत इतर राज्यांनी काय कार्यवाही केली आहे, ते लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या लगतच्या मध्यप्रदेश, कर्नाटक यासह इतर राज्यात याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान यावेळी या हंगामी कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यावर या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स योजना लागू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.