शिक्षक भरतीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा
शिक्षक भरतीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र त्यानंतरही शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त राहणार असल्याने पुन्हा शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून 2014 पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे. मात्र टीईटी परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत पास झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मे महिन्यात शिक्षक भरतीसाठी परिक्षा घेण्यात आली होती.
मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तरी सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरतीसाठी मंजूर झालेला जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा परिक्षा घेउन सीईटी घेण्यात आली तर शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे पुन्हा टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडल्याने मार्च 2020 पासून शिक्षक भरतीसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागा भरती करण्यास ब्रेक लावण्यात आला होता.
मात्र गेल्या काही दिवसापासुन शिक्षक भरतीसह विवीध खात्यांमध्ये जागा भरती करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शिक्षक भरती साठी टीईटी घेऊन निकाल लागल्यानंतर वेळेत सीईटी घेण्यात येईल आणि रिक्त जागा भरती केल्या जातील अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले असून राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी यापैकी पाच हजार जागा कल्याण कर्नाटकामध्ये भरती होणार आहेत.