व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून “आपले सरकार”च्या ५०० सेवा मिळणार
महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्र, व्हॉट्सअँपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता, आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात “व्हॉट्सअँप गव्हर्नन्स” चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.