‘होमिओपॅथी’साठी गुणमर्यादा होणार आता ३५ पसैंटाईल
होमिओपॅथी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेतील कमीत कमी गुणांची अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने सर्वच प्रवर्गासाठी नीट आणि तत्सम प्रवेश परीक्षांमधील गुणांमध्ये तब्बल १५ पर्सेटाईलची शिथिलता दिली असून, या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तरसाठी नीट आणि तत्सम परीक्षेत ५० पर्सेटाईल गुण मिळविणे बंधनकारक होते. त्यातून ५० पर्सेटाईलपेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहत होते.
परिणामी या गुणांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर गुणांची अट १५ पर्सेटाईलने कमी करण्यात आली असून, त्यामुळे ३५ पर्सेटाईल असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
ही शिथिलता २०२४-२५ या वर्षासाठी देण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने सोमवारी जारी केले. दरम्यान, आयोगाने पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवेशाची कट ऑफ डेट २० डिसेंबर करण्यात आली आहे.