अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती अर्ज ६ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन
राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.
अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे.
याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.
अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८.०० लक्ष इतके मर्यादित असावे.
परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी.
परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.
पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उतीर्ण केलेली असावी.
निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती ह्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार व संबंधित शासन निर्णयानुसार लागू राहील. परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गांनी Economy Class विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास इ.तपासून विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केले जाईल.
अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी व शर्ती इ.सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या योजनेस पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.०६ सप्टेंबर २०२४ पर्यंत वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा असे आवाहन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आले आहे