Take a fresh look at your lifestyle.

नीट-पीजीची परीक्षा आता ‘या’ तारखेला होणार

0

वैद्याकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट-पीजी (संयुक्त प्रवेश पात्रता परीक्षा पदव्युत्तर पदवी) ही प्रवेश परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नीट-यूजी परीक्षा निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी २३ जून रोजी होणारी ही परीक्षा सावधगिरीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आली होती.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या देशभरातील वैद्याकीय शिक्षण संस्थांतील सुमारे ७० हजार जागांसाठी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना नोंदणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २३ जूनला होणारी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यावर देशभरात गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षेच्या केवळ १२ तास आधी कोणतेही नेमके कारण न देता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले होते. परिणामी परीक्षा नियोजनातील ढिसाळपणाबाबत देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, एनबीईएमएस, राष्ट्रीय वैद्याकीय आयोग (एनएमसी), सायबर सेलचे अधिकारी, परीक्षा आयोजनातील तांत्रिक सहकारी टीसीएस यांच्या अनेक बैठका झाल्या. त्यात सुरक्षितपणे परीक्षा घेण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्याकीयशास्त्र परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार आता नीट पीजी ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती https:// natboard. edu. in या संकेतस्थळाद्वारे दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.