संतसेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळास मंजूरी
नाभिक समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संतसेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ ही उपकंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या उपकंपनीचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाकडून चालवण्यात येईल. या उपकंपनीमार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाखांपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, दहा ते पन्नास लाख अशी गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अशा योजना राबवण्यात येतील.
या महामंडळास पन्नास कोटी रुपयांचे भाग भांडवल मंजूर करण्यात आले असून, दरवर्षी पाच कोटी रुपये विविध योजना राबवण्यासाठी देण्यात येतील. या उपकंपनीसाठी बारा पदांना देखील मान्यता देण्यात आली आहे.