‘या’ योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान; महिलांना प्राधान्य…
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यन्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना चार एकर जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील)जमीन उपलब्ध करून देण्यात येते.
जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. सदर योजनेमध्ये दिनांक 13 मार्च, 2012 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत आणि बागायत जमिनीसाठी प्रती एकर रुपये 3 लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जमिनीची किंमत निश्चित करण्याचे निर्धारित करण्यात आले होते. तथापि, गेल्या काही वर्षात जमिनीच्या दरांमधील झालेली वाढ लक्षात घेता आणि योजनेचा लाभ अधिकाधिक प्रमाणात लाभार्थ्यांना पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून जमीन खरेदी किंमत यामध्ये सुधारणा करण्याची व योजनेची मार्गदर्शक तत्वे सुधारित करुन एकत्रित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१) जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याचा)
२) उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याचा)
३) भुमिहीन शेतमजूर असल्याचे तलाठयाचे प्रमाणपत्र
४) दारिद्रय रेषेचे कार्ड (सन २००२ चे )
(५) विधवा/परित्यक्ता/ घटस्फोटीता असल्याचा दाखला/पुरावा / पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञालेख
६) रहिवासी दाखला (किती वर्षाचा रहिवासी आहे याचा उल्लेख असलेले ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र
७) रेशन कार्डाची सत्यप्रत
८) इतरत्र जमीन नसल्याबाबत प्रतिज्ञालेख
योजनेच्या लाभासाठी अर्ज विहीत नमुन्यात संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावा.