Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा व अधिकार…

0

१) मोफत हवा चेक करणे व भरणे सुविधा:- पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरल्यानंतर प्रत्येक पेट्रोल पंपावर गाडीमध्ये हवा भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक हवा भरण्याची मशीन आणि त्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करणे अनिवार्य आहे. वाहनाच्या टायरमधील हवा भरण्यासाठी एक मशीन पेट्रोल पंपाच्या बाहेर येणाऱ्या मार्गावर एका कोपऱ्यात असतं हे तुम्ही पाहिलं असेल.

याठिकाणी तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये मोफत हवा भरू शकता. पेट्रोल पंप चालकानं वाहनचालकांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. त्यासाठी ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नाही.

२) मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा:- पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरण्याची मागणी करू शकतात आणि ते उपलब्ध करुन देणं पंप मालकाचं कर्तव्य आहे. यासाठी पेट्रोल पंप मालक आरओ किंवा वॉटर प्युरिफायर लावतात. काही ठिकाणी फ्रिजची देखील व्यवस्था असते. पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध करुन देणं पंप मालकाची जबाबदारी आहे. पेट्रोल पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे किंवा ती व्यवस्था करुन देणं पेट्रोल पंप मालकासाठी अनिवार्य आहे, जर तुम्हाला कुठल्याही पेट्रोलपंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळाली नाही तर त्याची देखील तुम्ही तक्रार करू

शकतात.

३) मोफत प्रथमोपचार कीट बॉक्स सुविधा:- प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्राथमिक उपचार कीट उपलब्ध असणं बंधनकारक आहे. यात प्राथमिक उपचारासाठीची काही औषधं, उपकरणं यांचा समावेश असतो. प्रत्येक पेट्रोल पंप मालकाला ही सुविधा मोफत देणं अनिवार्य आहे. अचानक कोणताही अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या औषधांचा उपयोग होऊ शकतो. पेट्रोलपंपावर प्रथमोपचार पेटी न दिल्यास संबंधित पेट्रोलपंपाकडे तुम्ही लेखी तक्रार करू शकता.

४) मोफत शौचालय सुविधा:- प्रत्येक पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा असणे अनिवार्य आहे. ही सुविधा ग्राहकांसाठी मोफत असावी यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नाही. पंप मालकानं याची काळजी घेणं बंधनकारक आहे. यासोबत पेट्रोल पंपावरील शौचालयं स्वच्छ आणि सुयोग्य असावीत. यात कोणत्याही प्रकारची अडचण ग्राहकांना येत असेल तर त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे.

५) मोफत फोन कॉल सुविधा:- जर आपल्याला आपल्या मोबाईलच्या नेटवर्क समस्येमुळे आपत्कालिन परिस्थितीत, कुणाला फोन करायचा असेल तर पेट्रोल पंपावर टेलिफोनची व्यवस्था असणं पेट्रोल पंप मालकांना बंधनकारक आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासोबतच पंप मालकाला एक फोन क्रमांक देखील रजिस्टर करावा लागतो. जेणेकरून पेट्रोल भरण्यासाठी येणारे ग्राहक त्याचा वापर करू शकतील.

६) आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणं: आवश्यकतेनुसार आग विझवण्यासाठी लागणारी सुरक्षा उपकरणे जसे की अग्निशामक यंत्र आणि वाळूच्या बादल्या इ. प्रत्येक पेट्रोल पंपावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोष्टी उपलब्ध असणं अनिवार्य आहे.

७) पेट्रोल आणि डिझेलची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार:- पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलची गुणवत्ता तपासण्याचा आपल्याला सर्व अधिकार आहे. आपण देय असलेल्या पैशासाठी आपल्याला इंधनाची योग्य गुणवत्ता मिळत आहे की नाही हे जाणून घेण्याचे आपण पात्र आहात. जर आपल्याला पेट्रोल पंपांवर गुणवत्ता तपासण्याची परवानगी नसेल तर आपण त्यांच्या रजिस्टरमध्ये तक्रार नोंदवू शकता किंवा पीजी पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता.