Take a fresh look at your lifestyle.

चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2022-2023 मधील चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परिसर, आर सी मार्ग, चेंबुर ठिकाणी होणार असून या अर्जांचे वाटप व स्वीकृती दि. 11 मे 23 पासून करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 750 क्षमतेचे मुलांचे वसतिगृह प्रस्तावित आहे. यापैकी 250 मुलांची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष 2022-23 या वर्षांमध्ये सुरू करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी निवासस्थान तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे.

वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.विदयार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावा. सदर विद्यार्थ्याकडे पालकांच्या उत्पन्नाचा दाखला असावा.

विद्यार्थी सन 2022-2023 मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावा, स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही.

पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत वसतिगृहात प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परिसर, आर सी मार्ग, चेंबूर या ठिकाणी अर्ज सादर करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त, प्रसाद खैरनार यांनी केले आहे.