Take a fresh look at your lifestyle.

कोतवाल पदासाठीही होणार ‘इतक्या’ गुणांची लेखी परीक्षा

0

कोतवाल पदासाठीही १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागाने घेतला आहे. राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हे अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून, शासकीय कर्मचारी नाही. त्यामुळे ७ मे १९५९ च्या शासन निर्णयानुसार त्यासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरताना मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळेच यापुढे कोतवालांची पदे भरताना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्नांची आणि १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून गुणवत्तेनुसार निवड आता करण्यात येणार आहे.

CBI मध्ये इंटर्नशिपची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमध्ये कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी आहे. त्यासाठीच्या 30 जागा उपलब्ध असल्याचं सीबीआयनं अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केलंय. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनऊ आणि बेंगळुरू इथल्या कार्यालयांमध्ये निवड केलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल.

सीबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशीपच्या कालावधीत कोणताही आर्थिक मोबदला मिळणार नाही. तसंच उमेदवारांना स्वतःच त्यांच्या राहण्याची व प्रवासाची सोय करावी लागेल.

या उमेदवारांच्या पात्रतेबाबतही सीबीआयनं निकष दिलेले आहेत. त्यानुसार, हे उमेदवार कायद्याचे विद्यार्थी असावेत.

त्या संबंधीचं इंग्रजी माध्यमाच्या पदवीचं शिक्षण त्याच्याकडे असावं. तसंच मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातील त्यांचं शिक्षण असावं.

जे विद्यार्थी 5 वर्षांचा इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांनी अभ्यासक्रमातील 8 वं सेमिस्टर पूर्ण केलेलं असावं किंवा 8 वं सेमिस्टर सुरू असावं. जे विद्यार्थी 3 वर्षांचा एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांचं चौथं सेमिस्टर सुरू असावं किंवा पूर्ण झालेलं असावं.

इच्छुक उमेदवारांना 3 ते 6 महिन्यांची इंटर्नशीप करता येईल.

अधिकृत माहितीनुसार उमेदवार अर्ज डाउनलोड करून तो भरून सही करून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. त्यासोबत उमेदवारांनी सीबीआयमध्ये इंटर्नशीप का करायची आहे, याबाबत 150 शब्दांची माहिती लिहून पाठवणं गरजेचं आहे.

हे अर्ज स्पीड पोस्टनं पाठवावेत असं सूचनेमध्ये म्हटलंय. इतर कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पोलीस अधीक्षक, सीबीआय अ‍ॅकॅडमी, हापूर रोड, कमला नेहरू नगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश-201002 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावा.

30 मे 2023 पर्यंत हे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजेत.

अपूर्ण व अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील असं सीबीआयनं म्हटलं आहे.

अधिकृत वेबसाईट- https://cbi.gov.in/