आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या साडे तीन वर्षात शासकीय नोकरी भरती खोळंबली होती. आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती होणार असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्य सरकारने पुढाकार घेत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या १० हजार जागा भरण्यात येतील. आरोग्य विभाग भरतीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. साडे अकरा लाख तरुण या भरतीच्या प्रतिक्षेत होते. परीक्षा शुल्क भरूनही भरती झाली नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.
कसं आहे भरतीचं वेळापत्रक
१ जानेवारी ते ७ जानेवारी– भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
२५ जानेवारी ते ३० जानेवारी– उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी– पात्र उमेदवारांची यादी जाहीर
२५ मार्च आणि २६ मार्च– विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
२७ मार्च ते २७ एप्रिल– या कालावधीत उमेदवारांची निवड
राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
यासोबतच शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागादेखील लवकरच भरल्या जातील, असेही महाजन यांनी सांगितले.
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष लक्ष दिलेच नाही व ही भरती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. मात्र आता या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याचदिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन म्हणाले.
महिनाभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले.