Take a fresh look at your lifestyle.

उच्च शिक्षणासाठी कर्ज कसे मिळवायचे; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

आजच्या तरुणांचा उच्च शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. बारावी नंतर विविध तांत्रिक शिक्षणाचे पर्याय पदवी व पदव्युत्तर पर्याय तरुणांना उपलब्ध आहेत. शिक्षण संस्थांच्या दर्जानुसार शिक्षण शुल्क असते. सर्वच पालकांना शिक्षण शुल्क परवडेल असे नाही. त्यातच परदेशात शिक्षण घेण्याकडेही तरुणांचा ओढा वाढला आहे.

परदेशातील शिक्षण शुल्क बहुतेक पालकांना परवडत नाही. शिष्यवृत्तीनंतरही शुल्क मोठे असते. त्यामुळे शैक्षणिक कर्ज हा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते. शैक्षणिक कर्ज किती मिळते? त्यासाठी काय निकष आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जवळच्या राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बँकेत याबाबत अधिक माहिती मिळू शकते.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय:- आपण निवडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थी बँकेकडून विशिष्ट मुदतीचे कर्ज घेतात. त्याला शैक्षणिक कर्ज म्हणतात. शैक्षणिक कर्जाचे दोन प्रकार आहेत. देशांतर्गत शिक्षणासाठी आणि परदेशातील शिक्षणासाठी कर्ज, कौशल्य अभ्यासक्रमा साठीही कर्ज मिळते.

देशांतर्गत शिक्षण:- अर्जदाराने भारतातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यास आणि कर्जासाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण केले तर बँकेकडून कर्ज मिळते.

परदेशी शिक्षण कर्ज:- परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळते. पात्रता निकष पूर्ण केल्यावर विमान भाडे, राहण्याची व्यवस्था आणि एज्युकेशन फीसाठी दिले जाते.

कर्जाची परतफेड कधी करता येते:- अभ्यासक्रम संपल्यानंतर एक वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर कर्जाची परतफेड सुरू होते. कर्ज परतफेडीसाठी प्रत्येक बँकेची वेगवेगळी मुदत असते. कर्जाचा हप्ता कमी करण्यासाठी अभ्यासक्रमादरम्यानही काही रक्कम भरता येते. काही बँका व्याजदरात सवलतही देतात.

कर्ज किती मिळू शकते:- भारतातील राष्ट्रीयकृत बँका आणि नॉन बँकिंग वित्त संस्था विद्यार्थ्यांना कमी व्याजदराने शैक्षणिक कर्ज देतात. अभ्यासक्रमावर आधारित कर्जाचा प्रकार, रक्कम आणि कर्जफेडीची मुदत बँका ठरवतात. पदवीपर्यंतचे शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमानुसार कर्जाचे प्रकार असतात. कर्जासाठी मालमत्ता तारण ठेवावी लागते. पालक सहकर्जदार असतात. पालकांच्या वार्षिक उत्पन्नानुसार कर्ज मिळते. केंद्र सरकारची व्याज अनुदान योजनाही असते. भारतातील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण्यासाठी ३५ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. साधारण परदेशातील उच्च शिक्षणासाठी ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्तही कर्ज मिळते.