गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरणार
सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहे. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.
राज्य शासकीय कायालयातील गट-क मधील लिपिक संवर्गातील सर्व पदे या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रस्तुत शासन शासन निर्णय लिपिक वर्गीय भरतीस लागू राहील.
राज्यात ७५ हजार पदांसाठी भरती:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत नामनिर्देशनाद्धारे परीक्षा घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित व अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आधीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवानिवड मंडळाच्या कक्षेतील, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेची रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने वरील संस्थांमार्फत भरण्याचा निर्णय झाला.
या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी-शर्ती सामान्य प्रशासन विभागामार्फत (सेवा) निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.