‘या’ समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वार्षिक 60 हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार…
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतला. राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दरवर्षी निर्वाह भत्ता दिला जातो, तसाच भत्ता आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही दिला जाणार आहे.
100 मुलांचे वसतीगृह:- मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु करण्याचे नियोजन करावे. याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती देण्याचे आदेश पाटील यांनी दिले.