अग्निशमन दलात 900 अग्निशामकांची भरती; जाणून घ्या कशी राबवणार भरती प्रक्रिया
पालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल 900 अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. ही भरती ‘कायमस्वरूपी’ तत्त्वावर केली जणार असून अग्निशामकांना 30 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.
नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या भरतीमुळे बेरोजगारांना नोकरीची आणि अग्निशमन दलात नोकरी करून शौर्य गाजवण्याची संधीही उमेवारांना मिळणार आहे. मुंबईत आगीसह कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेप्रसंगी अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यासाठी हजर असतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते बचावकार्य करीत असतात. मात्र संपूर्ण अग्निशमन दलातील 3500 पदांपैकी तब्बल 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण येतो.
त्यामुळे अग्निशामकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेवी ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत.
अशी राबवणार भरती प्रक्रिया:- सध्या वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मेरिटनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी 800 मीटर धावणे, डमी बॉडी घेऊन पळणे, रोपवर चढणे आदी चाचण्या होणार आहेत.
भरतीमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.