सरकारचे ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांना दिवाळी भेट; लवकरच ‘ही’ सेवा सुरु होणार
देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वृद्धापकाळात बॅंकेतील कामे करताना, ज्येष्ठ नागरिकांची मोठी धावपळ होते. अनेकदा बँकेत नागरिकांची गर्दी असल्यास, छोट्याशा कामासाठीही वृद्धांना बराच वेळ ताटकळत राहावं लागतं. विशेषत: सरकारी बँकांमध्ये ज्येष्ठांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
आयुष्याच्या उतार वयात वृद्धाची होणारी होरपळ लक्षात घेऊन मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ‘बेसिक बँकिंग सेवा’ देण्याची तयारी करीत आहे. देशातील 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांसाठी केंद्र सरकारतर्फे ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाणार आहे.
ज्येष्ठांसह दिव्यांगानाही लाभ:- खरं तर ‘आरबीआय’ने या आधी दोन वेळा ‘बँक आपल्या दारी’ ही सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. बँकांना पहिल्यांदा 31 डिसेंबर 2017 व दुसऱ्यांदा 30 एप्रिल 2020 पर्यंतची डेडलाइन दिली होती, परंतु आतापर्यंत ही सेवा देशात सुरू झालेली नाही.
आता अर्थ मंत्रालयाअंतर्गत येणारा वित्त सेवा विभाग अर्थातच डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस मार्फत बँकर्ससाठी नवा नियम आणण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर दिव्यांगांसाठीही ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाईल. त्यासाठी अत्यंत कमी शुल्क आकारलं जाईल.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘युनिव्हर्सल नंबर’ लाँच केला जाणार आहे.
केंद्र सरकार एका ठराविक कालमर्यादेत ही सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे. ‘
बँक आपल्या दारी’ या सेवेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना खातं उघडणं, फिक्स डिपॉझिट, पेन्शन सेवा, विमा, गुंतवणूक, कर्जपुरवठा अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. ज्या बँक शाखांची निवड केली जाईल, त्यांना सेवा देणं बंधनकारक राहिल. त्यानंतर दुसऱ्या शाखाही या सेवेशी जोडल्या जातील.
केंद्र सरकारच्या ‘बँक आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत बँकिंग सेवांसोबतच विमा आणि चलन सेवाही दिली जाणार आहे. अशी सेवा देणाऱ्या बँकांच्या शाखांना त्यांच्या वेबसाइटवर पूर्ण माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आल्याचे समजते.