‘या’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या…
मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार होत्या. आता त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
विद्यापीठाकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली होती. या मागणीवर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून 2022 च्या हिवाळी सत्राच्या सत्र 5 बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई विद्यापीठ 2022 च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.
या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले की, “2022 च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.