ठेवीदार होणार मालामाल, ‘या’ योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय…
गेल्या काही दिवसांत छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक कमी होत चालली होती. कारण, या योजनांमधून चांगला परतावा मिळत नव्हता. दुसरीकडे शेअर मार्केट, म्युच्युअल फंडात रिक्स असली, तरी चांगला परतावा मिळत असल्याने त्यातील गुंतवणूक वाढली होती.
देशात सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ (PPF), तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांचा आढावा घेत असते. त्यात या योजनांच्या व्याजदराबाबत अर्थ मंत्रालय निर्णय घेत असते. यावेळी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीचे व्याजदर अर्थ मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आले आहेत.
व्याजदरात मोठी वाढ:- छोट्या बचत योजनांकडे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा कल वाढावा, यासाठी मोदी सरकारने नुकताच मोठा निर्णय जाहीर केला. मोदी सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी छोट्या योजनांवरील नवीन व्याजदर जाहीर केले. त्यात काही योजनांवरील व्याजदरात 0.3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
‘आरबीआय’ने रेपो दरात वाढ केल्यामुळे ठेवींवरील व्याजदर वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.. नवीन दरांनुसार, पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या ठेवीवर आता 5.8 टक्के व्याज मिळेल. आतापर्यंत हा दर 5.5 टक्के होता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी, आता 7.6 टक्के व्याजदर असेल. पूर्वी तो 7.4 टक्के होता. किसान विकास पत्रावरील व्याज 7 टक्के असेल. पूर्वी तो 6.9 टक्के होता. तसेच, आता 124 ऐवजी 123 महिन्यांत योजना मॅच्युअर होईल. मात्र, पगारदार लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पीपीएफ’ बचत योजनेवरील व्याजदर 7.1 टक्के कायम आहे.
दरम्यान, ‘आरबीआय’ने मे-2022 पासून रेपो रेटमध्ये 1.4 टक्के वाढ केलीय. त्यामुळे बँकांकडूनही ‘एफडी’वरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.. त्यानंतर आता छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केल्याने या योजनांकडे पुन्हा एकदा गुंतवणुकदारांचा कल वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.