Take a fresh look at your lifestyle.

‘या’ आजारांवरील औषधे स्वस्त होणार, केंद्र सरकारची विशेष योजना…

0

गेल्या काही दिवसांत हाॅस्पिटलचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. महागड्या तपासण्या, औषधे व रुग्णालयातील उपचारावर खर्च करताना नातेवाईकांची दमछाक तर होतेच, शिवाय खर्चाचे आकडे पाहून रुग्णही हादरुन जातो. त्यातही असाध्य आजारांवरील औषधांचा खर्च तर अनेकांच्या खिशाला परवडत नाही.

सर्वसामान्यांची होणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आता असाध्य आजारावरील औषधे मिळणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने ‘एनएलईएम’ योजना सुरु केली असून, त्यामुळे महागडी औषधे स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॅन्सर, मधुमेहासह इतर असाध्य आजारांवर उपचार करावाच लागतो. मात्र, या आजारावरील उपचार, त्यावरील औषधांवर मोठा खर्च होतो. रुग्णांसमोर पर्याय नसल्याने फार्मा कंपन्या मनमानी पद्धतीने औषधांच्या किंमती वाढवतात. त्यात सामान्य रुग्णांची मोठी ससेहोलपट होते. ही बाब लक्षात आल्यावर केंद्र सरकारने फार्मा कंपन्यांना चाप लावला आहे.

ही औषधे स्वस्त होणार:- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 7 वर्षांनंतर औषधांची अद्ययावत राष्ट्रीय सूची (NLEM 2022) तयार केली असून, त्यात 27 श्रेणींत 384 औषधांचा समावेश केला आहे. या यादीत 34 नवीन औषधांचा समावेश केला असून, 26 औषधे हटवली आहेत. औषधांच्या राष्ट्रीय सुचीत कॅन्सर, मधुमेह, अॅन्टिबायोटीक, वॅक्सीन, सिगारेटचे व्यसन सोडवणाऱ्या निकोटीन औषधांचा समावेश आहे. त्यामुळे ही औषधे आता ग्राहकांना स्वस्तात मिळतील.

कॅन्सरवरील बैंडामुस्टिन हाइड्रोक्लोराइड, इरीनोटेकन एचसीआई ट्राईहाईड्रेट, लोनालिडोमाइड व ल्यूप्रोलिड एसीटेट या प्रभावी औषधांचा समावेश या यादीत केला आहे. तसेच, संसर्ग रोखणाऱ्या 18 औषधांचा समावेश यादीत केला आहे. त्यामुळे बॅक्टेरिया, फंगस सारख्या संसर्गजन्य आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होतील.कोरोनावर ‘इवरमेक्टिन’चा वापर करण्यात येत होता. हे औषधही आता स्वस्त होईल. इट्राकोनेजोल, मुपिरोसिन, टर्बिनाफिन, डेक्लाटेस्टिवर, मेरोपेनेम, सेफुरोक्साइम, एमिकासिन, बेडाक्विलाइन, डेलामेनिड, एबीसी डोलटेग्रेविर यांसारख्या संसर्गजन्य आजारांवरील औषधांचाही समावेश यादीत केला आहे.

ही औषधे महाग होणार:- औषधांच्या राष्ट्रीय सुचीतून पोटातील गॅससंबंधीच्या तक्रारी दूर करणारी गैस्ट्रो इंटेस्टनल, एंटासिड सॉल्ट रैनिटिडिन व सुक्रालफेट ही औषधे हटवली आहेत. त्यामुळे ही औषधे महाग होण्याची शक्यता आहे.