Take a fresh look at your lifestyle.

‘लम्पी’ आजाराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…

0

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनावरांवर लम्पी चर्मरोगाचे संकट कोसळले आहे. त्यात अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने पशूपालक मोठ्या चिंतेत सापडले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पशूपालकांना चांगला दिलासा मिळाला आहे.

‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई (Compensate) देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

जनावरांना होणाऱ्या लम्पी चर्मरोगावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या आजारामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकरी वा पशुपालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील (एनडीआरएफ) निकषांनुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई दिली जाणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.

जिल्हा नियोजन समित्यांनी 2022-23 मधील उपलब्ध निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्रीवर हा निधी खर्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.