‘या’ विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती देणार
मुंबई- भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी येत्या तीन वर्षात शिष्यवृत्ती देण्यात येईल.
याशिवाय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कांदळवन क्षेत्रात ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची पाचवी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जैवविविधता विषयातील या ७५ विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचा उपयोग महाराष्ट्रासाठी करणे गरजेचे असेल. प्रत्येक वर्षी साधारण २५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असून तीन वर्ष हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी प्रत्येक वर्षी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.