जळगाव जिल्ह्यातील इच्छुकांसाठी मधमाशी पालनाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव:- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात लागु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लाभ घेण्याकरिता पात्र उमेद्वारांना अर्ज करण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

या योजने मध्ये पात्र उमेदवारांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्याच्या स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने खरेदी, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करून देण्यात येणार आहे. वैयक्तीक मधपाळ करतांना अर्जदार हा साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राध्यान्य असेल, अर्जदाचे वय 15 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे व किमान 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल तसेच 10 मधपेट्या व त्यासंबधी लागणारे साहित्य घेणे आवश्यक असेल. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळामध्ये अर्जदाराची किमान 10 वी पास, वय 21 वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
अर्जदाराच्या नावे किंवा त्याच्या कुटूंबामधील व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्वावर घेतलेली जमीन आवश्यक आहे. लाभार्थांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. अर्जदारास किमान 50 दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य असेल त्याचबरोबर 10 मधपेट्या व त्यासंबधी इतर साहित्य घेणे आवश्यक असेल. केंद्रचालक संस्थांची संस्था हि नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फुट सुयोग्य अशी इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवा असावीत. व किमान 10 दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य असेल आणि 10 मधपेट्या व त्यासंबधीचे इतर साहित्य घेणे आवश्यक आहे. शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन प्रशिक्षणात पारंपारीक आग्या मध संकलन करणाऱ्या कारागिरास प्रथम प्राधन्य देण्यात येईल व यांच्याकडे 5 व्यक्तिंचा समुह आवश्यक आहे. छंद व विषेश प्रशिक्षणात 5 दिवसाचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. शेतकरी, शाळा कॉलेज विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, शासकिय सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांसाठी प्रवेश फि रू. 25 असेल व किमान 2 मधपेट्या स्वखर्चाने घेणे आवश्यक असेल. लाभर्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय करण्यास बंदी असेल व मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे आवश्यक असणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हाग्रामोद्योग अधिकारी, माहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव व श्री. सुरवाडे मो. नं. 9623578740 तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर जि. सातारा दु. क्र. 02168-260264 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रान्वये केले आहे.