अरे व्वा! निसर्ग प्रेमींसाठी खुशखबर; वन महोत्सव/वृक्ष लागवड योजनेतंर्गत मिळणार अत्यल्प दरात रोप
दि. १५ जून ते ३० सप्टेंबर, हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. त्यानुसार दिनांक ४ जून २०२१ च्या शासन निर्णयान्वये सन २०२१-२२ साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वन महोत्सव / वृक्ष लागवड अनुदान योजना 2022-23 अनुदानावर सर्व प्रकारची रोप/ कलम:-
सन २०२१-२२ या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा
प्रतिसाद लक्षात घेवून, ही योजना सन २०२२-२३ या
आर्थिक वर्षात दिनांक १५ जून २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
१) राज्यात सन २०१७ पासून “५० कोटी वृक्ष लागवड” हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढे ही चालू राहावा व या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहीक पडीक क्षेत्र, व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा, तसेच सर्व सामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येईल. वन महोत्सवाच्या कालावधीत आणि सर्वसाधारण कालावधीत रोपांचा पुरवठा, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात खाली नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२) राज्यात सन २०२२ च्या पावसाळ्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करणेसाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा, यासाठी अत्यल्प व सवलतीचे दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत
आहे.

३) ज्या शासकीय यंत्रणांना, स्थानिक स्वराज्य संस्था इ.ना वृक्ष लागवड करावयाची आहे, अशा यंत्रणांकडे रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद
नसल्यास, अशा यंत्रणांना या वनमहोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा संबंधित रोपवाटिकेत केला जाईल. यासाठी त्यांनी लागणा-या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांचेकडे सोबतच्या मागणी पत्राद्वारे करावी. उपवनसंरक्षक (प्रादेशिक / विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग हे जिल्ह्यात उपलब्ध प्रादेशिक/सामाजिक वनीकरण रोपवाटीकेमधून यंत्रणानिहाय/मागणीदार यांना रोप पुरवठ्याचे आदेश निर्गमित करतील व इतर यंत्रणेशी योग्य समन्वय साधतील.
४) वृक्ष लागवड करू इच्छिणारी खाजगी विनाअनुदानीत विद्यालये/महाविद्यालये यांचेसाठी सन २०२२-२३ मध्ये प्रति रोप दर रु.१/- मात्र राहील. (सदरील प्रति रोप दर रु.१ हा सुरवातीचे १०० रोपांकरीता राहील व त्यापुढील प्रत्येक रोपांसाठीचा दर हा प्रति लहान रोप दर रु.१०/- व प्रति मोठे रोप (२०x३० से.मी.) दर रू. ४०/- असा राहील आणि प्रति मोठे रोप (२५ x४० से.मी.) दर रू. ५०/- असा राहील).
५) शासकीय यंत्रणा किंवा इतर संस्था यांना जर रोपे
लागवड शासकीय जागेत करावयाची असल्यास त्यांचेकडे त्या करिता निधी उपलब्ध नसल्यास लागवड करणारी शासकीय संस्था किंवा इतर संस्था व शासकीय जागाधारक संस्था यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना या वनमहोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पूरवठा प्रति हेक्टरी एक हजार या मर्यादेपर्यंत (१०००) किंवा त्यापेक्षा कमी (मागणीनुसार) करण्यात येईल. तसेच संस्थांची मागणी असल्यास व शासकीय रोपवाटिकेत रोपे
उपलब्ध असल्यास वनमहोत्सव कालावधी व्यतिरिक्त
सर्वसाधारण कालावधीमध्ये देखील सदरील तरतुद लागू राहील.
