बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी; ३ लाखांहून अधिक रिक्त जागांवर होणार भरती
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या टप्प्यात येत्या काळात सुमारे ३ लाख ३० हजार २०२ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार (MOU) देशातंर्गत आणि विदेशी कंपन्यांपैकी ९० टक्के कंपन्यांना जागावाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात तब्बल १ लाख ८९ हजार ५०८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

राज्य सरकारतर्फे उद्योगधंदे, रोजगार व गुंतवणुकीस चालना देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यानुसार ९८ स्थानिक आणि विदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्यात अॅग्रो (Agro), लॉजिस्टिक (Logistic), आयटी (IT), केमिकल (Chemical) आणि इंजिनीअरिंग (Engineering) कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांपैकी जवळपास ९० टक्के कंपन्यांना राज्य सरकारकडून जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यातील काही कंपन्यांना खासगी मालकीच्या ठिकाणीही जमीन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास दोन कंपन्यांसाठी अद्याप जागांचा शोध सुरू असून, या दोन कंपन्या ठाणे येथे गुंतवणूक करणार आहेत. तर पाच कंपन्यांना जागा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसून, या पाचही कंपन्या आयटी, लॉजिस्टिक आणि स्टील क्षेत्राशी निगडित असल्याचे कळते. या कंपन्या रायगड, पुणे आणि पालघर येथे जागेच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स, पीएमआय इलेक्ट्रो मोबालिटी सोल्युशन या कंपनीकडून पुण्यातील तळेगाव आणि चाकण येथे गुंतवणूक होणार आहे.