पेपरफुटीचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रकिया राबविणार
राज्यभर गाजलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षेतील घोटाळाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. परीक्षेचा पेपर नाह फुटल्याचा अहवाल पुणे सायबर पोलिसांनी राज्य सरकारकडे तीन महिन्यांपूर्वीच सादर केला. यानंतर ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सरकारने परीक्षा रद्द करण्याचा किंवा निकालाबाबत निर्णय घेतला नाही.यामुळे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत असल्याचा आरोप होत आहे. आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ च्या ६२०५ पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबरला लेखी घेण्यात आली.

परीक्षेदरम्यान विविध केंद्रांवर पेपर फुटल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर आरोग्य विभागानेही यावर आक्षेप घेत ‘न्यास कम्युनिकेशन’ ला नोटीस बजावत उत्तर मागितले होते. आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थी संघटनेचा आरोप, परीक्षा केंद्रांवरील पुरावे आणि उणिवानंतरही राज्य सरकारकडून याविरोधात कुठलीही कठोर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, म्हाडा परीक्षेच्या पेपरफूट प्रकरणानंतर पुणे सायबर पोलिसांकडून आरोग्य विभाग परीक्षा घोटाळासंदर्भात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागातील पेपर फोडणाऱ्या लातूर येथील उपसंचालक आणि आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह अन्य भागातूनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभागाने अद्यापही परीक्षेबाबत कुठलाही निर्णय न दिल्याने सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.
आरोग्य मंत्र्यांचे फक्त आश्वासन
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, पोलिसांचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनात दिले होते. पुणे पोलिसांनी तीन महिन्या आधीच वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ या दोन्ही परीक्षाचा पेपर फुटल्याचा अहवाल सरकारकडे सोपविला. त्यानंतर टोपे यांनी, परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याचे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले. मात्र, अद्यापही ठोस निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पेपरफुटीचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रकिया राबविणार
सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमितची १७ सहस्र ६६२, तर कंत्राटी १२ सहस्र ३०६ अशी २९ सहस्र ९६८ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील पदांच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर भरतीप्रक्रियेची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांसह अन्य काही आमदारांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला ४ मार्चला दिलेल्या लेखी उत्तरात राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली आहे.
या उत्तरामध्ये राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आरोपींवर खटला प्रविष्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. ‘अ’ गटातील १ सहस्र ७९५, ‘ब’ गटातील ९९६, तर ‘क’ गटातील ९ सहस्र ३४२ इतक्या जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आली आहेत.