Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! वैद्यकीय(मेडिकल) शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची गरज नाही; वैद्यकीय अभ्यास संस्था स्थापन करण्याचा विचार

0

नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यात युद्ध सुरू असून हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. हे सर्व विद्यार्थी युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. हे युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनसारख्या छोट्याशा देशात मेडिकलच्या शिक्षणासाठी (medical education) जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाली. त्यातच युक्रेनमध्ये ज्या भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, त्या नवीन नावाच्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की चांगले मार्क असूनही त्यांच्या मुलाला मेडिकलमध्ये प्रवेश मिळाला नाही. शिवाय देशातल्या प्रायव्हेट कॉलेजपेक्षा युक्रेनधील शिक्षणाचा खर्चही कमी आहे. या सर्व चर्चांशी संबंधित आता महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (anand Mahindra) यांनी ट्विट केलंय.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पुढे महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये (Mahindra university campus) वैद्यकीय अभ्यास संस्था स्थापन करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलंय. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिलंय की, “मला कल्पना नव्हती की भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे. टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ सीपी गुरनानी यांना टॅग करत ते विचारतात की, महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वैद्यकीय अभ्यास संस्था आपण स्थापन करू शकतो का?”

आनंद महिंद्रा हे विविध विषयांवर ट्विटरवरून त्यांची मतं व्यक्त करत असतात. तसंच एखाद्याचं वेगळं, भन्नाट टॅलेंट पाहिलं, तरी ते व्हिडिओ किंवा बातमी शेअर करून कौतुक करत असतात. दरम्यान, भारतातील मेडिकल फिल्डमध्ये कॉलेजची (medical colleges) कमतरता असल्याची बाब या युद्धामुळे त्यांच्या लक्षात आली असून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच येत्या काळात महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करू शकतो का, या संदर्भात चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. त्यातच आनंद महिंद्रा हे दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे येत्या काळात महिंद्रा विद्यापीठात मेडिकल कॉलेज दिसले, तर आश्चर्य वाटायला नको. अनेक युजर्सनी त्यांच्या ट्विटला रिप्लाय देत फी कमी ठेवण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या 18,095 भारतीय विद्यार्थ्यांपैकी सुमारे 90% विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. रशियानं युद्ध पुकारल्यानंतर हे विद्यार्थी तिथून बाहेर पडण्यासाठी पायी निघाले आहेत. दरम्यान भारत सरकारने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. पण आणखी हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये (Indian students in Ukraine) अडकलेले आहेत. त्यांच्यापैकी बहुतांशी विद्यार्थी हे मेडिकलचे आहेत.