चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. १० : चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर, होलार आदी) बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ मध्ये विविध शासकीय योजना राबविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
महामंडळामार्फत यंदा ‘५० टक्के अनुदान योजना’(७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’(१० लाभार्थी) राबविण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅनकार्ड, उद्योग आधार प्रमाणपत्र, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, ग्रामपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
व्यवसायासंदर्भातील तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, जीएसटी क्रमांक असलेले दरपत्रक जोडवे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे वारसदारांच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र; तसेच जामीनदारांचे वीज नमुन्यातील शपथपत्र, आधार संलग्न बँक खाते तपशील, सक्षम जामिनदारांची कागदपत्रे आणि बँकेचा सिबिल अहवाल आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर, होलार आदी) असावा; तसेच त्याने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाच्या तीन प्रती कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे स्वतः उपस्थित राहून मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसह कर्ज प्रस्ताव दाखल करावेत.
या योजनांचा लाभ घेऊन समाजबांधवांनी आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांनी केले आहे.