मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अमरावतीत कुस्तीसाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र
१७ जून रोजी खेळाडू निवड चाचणी; पात्र खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. १० : मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्राची स्थापना अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मोर्शी येथील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती विभागाचे उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा) गणेश जाधव यांनी केले आहे. या केंद्रामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना निवासी स्वरूपात दर्जेदार आणि तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, निवास व भोजन सुविधा, क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य, देश-विदेशातील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागाची संधी; तसेच वैद्यकीय विमा संरक्षण अशा विविध सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
निवड चाचणीसाठी २५ वर्षांखालील मुले व मुली पात्र असून, त्यांनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र यांसह उपस्थित राहावे, असही कळविण्यात आले आहे. राज्यस्तरीय पदक विजेते अथवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.त्यांना क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक राहील; तसेच शासनमान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. संजय तिरथकर (९४२२८३८२३७), डॉ. रणवीरसिंग राहल – कुस्ती (७०२०४९१०४५), श्री. अनिल इंगळे (९९७००७११७२) किंवा श्री. अनुप वानखेडे (९८८१९८०२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
श्रद्धा मेश्राम/विसंअ