बार्शी टाकळीच्या ‘महागाव’मध्ये शेतकरी गटाचा चमत्कार: सामूहिक शेती आणि प्रक्रिया उद्योगातून साधली प्रगती!
अकोला: बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव येथील शेतकऱ्यांनी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या (PoCRA) माध्यमातून संघटित होत शेतीमध्ये एक नवा बदल घडवून आणला आहे. ‘गुरुकृपा शेतकरी उत्पादक गटा’च्या माध्यमातून त्यांनी केवळ शेतीच केली नाही, तर प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन आपली आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.
गोदामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले
या गटाला गोदाम बांधकामासाठी १२ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. या सुसज्ज गोदामामुळे शेतकऱ्यांचे अनेक फायदे झाले आहेत:
-
सुरक्षित साठवणूक: नैसर्गिक आपत्तींपासून शेतमाल सुरक्षित राहतो.
-
योग्य भावाची प्रतीक्षा: बाजारात भाव कमी असताना माल विकण्याची घाई न करता, योग्य भाव मिळेपर्यंत माल सुरक्षित ठेवता येतो.
-
वाहतूक खर्चात बचत: व्यापारी थेट गावात येऊन माल खरेदी करत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचला आहे.
डाळमिल आणि मूल्यवर्धन
शेतकरी उत्पादक गटाला डाळमिलसाठी ८ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. आता या भागातील शेतकरी आपल्या तूर, हरभरा, उडीद, मूग यांसारख्या पिकांवर प्रक्रिया करून ‘डाळ’ स्वरूपात विक्री करत आहेत. यामुळे कच्च्या मालाच्या तुलनेत प्रक्रिया केलेल्या मालाला अधिक भाव मिळून उत्पन्नात थेट वाढ झाली आहे.
सामूहिक शेती: ‘कांदा बी’ उत्पादनातून मोठी कमाई
गटातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन ३० एकर क्षेत्रावर कांदा बी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे:
-
करार शेती: नामांकित कंपनीशी करार करून कांदा बी उत्पादन.
-
उत्पन्न: एकरी ५ क्विंटल बी उत्पादन आणि प्रति क्विंटल ४५ हजार रुपये भाव, यामुळे प्रति शेतकरी जवळपास २ ते २.२५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य झाले आहे.
शेडनेटद्वारे संरक्षित शेती
गटातील ज्ञानेश्वर ढोरे यांनी ८.१५ लाख रुपयांच्या अनुदानातून २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारले. उन्हाळी काकडी आणि शिमला मिरचीच्या लागवडीतून त्यांनी साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
सामूहिक प्रयत्न, योग्य तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास शेती किती फायदेशीर ठरू शकते, याचे ‘महागाव’ हे एक उत्तम उदाहरण आहे.
संकलन: अकोला जिल्हा माहिती कार्यालय.