ग्रामीण रुग्णांसाठी आरोग्यक्रांती: किडनी रुग्णांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय
राज्यात १०४ डायलिसीस केंद्रांद्वारे मोफत सेवा उपलब्ध

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाडायलिसीस’ योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १२ नवीन डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण होणार असून, त्यामुळे राज्यातील एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे.
राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना निःशुल्क व सुलभ डायलिसीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सध्या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये किमान ५ बेड्स तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ९२ केंद्रे कार्यरत असून, ५५८ डायलिसीस बेड्सद्वारे सेवा दिली जात आहे.
नवीन लोकार्पित होणाऱ्या १२ केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. रत्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे.
‘महाडायलिसीस’ योजना पूर्णतः एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळासह मोबाइल अॅपद्वारेही नागरिकांना माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रणालीमुळे रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा मिळाल्याने उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्येच दर्जेदार व मोफत डायलिसीस सेवा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.