ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे शासनाचे निर्देश

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
शासन निर्णय दि. ०२ एप्रिल २०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यांनी बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू असलेल्या जिल्ह्यांनी स्वतंत्र मागणीपत्र सादर करणे आवश्यक असून, उर्वरित जिल्ह्यांनी एकत्रित रिक्त पदांचे मागणीपत्र तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास पाठवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर मागणीपत्र दिनांक ०८ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शासनास सादर करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील महसूल यंत्रणा अधिक सक्षम होण्यास तसेच प्रशासकीय कामकाजात गती येण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.