ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
विमा, आर्थिक सहाय्य व शिक्षण सुविधा एकाच छताखाली

जळगाव(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागामार्फत राज्यातील नोंदणीकृत व परवानाधारक ऑटोरिक्षा तसेच मिटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून चालक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासाचा हेतू आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत या मंडळासाठी सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील वैध परवानाधारक, अनुज्ञप्तीधारक व बिल्लाधारक चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. सभासद नोंदणी व ओळखपत्रासाठी वार्षिक शुल्क रुपये ८००/- निश्चित करण्यात आले आहे.
मंडळाच्या योजनांमध्ये जीवन विमा व अपंगत्व विमा, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास रु. ५०,०००/- पर्यंत आर्थिक सहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्यविकास प्रशिक्षण, ६५ वर्षांवरील चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना, तसेच वाहन व गृह खरेदीसाठी कर्ज सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार व राज्यस्तरीय मंडळाच्या मान्यतेनुसार इतर पूरक कल्याणकारी योजना वेळोवेळी राबविण्यात येणार आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे आतापर्यंत १६६ पात्र सभासदांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, भुसावळ येथील श्री. दिपक मधुकर नाथ यांना दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी प्रथम सभासद म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले. हे ओळखपत्र प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राजेंद्र वर्मा यांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. प्रविण बागडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सचिन बुरुड तसेच संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी श्री. प्रल्हाद सोनवणे, श्री. जब्बार शेख, श्री. प्रमोद वाणी, श्री. अशपाक शाहा, श्री. किरण दाभाडे व श्री. शेख असलम उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व पात्र ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राजेंद्र वर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.