दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दरवाढीस मंत्रिमंडळाची मान्यता
शुल्क प्रतिपूर्ती, मासिक अर्थसहाय्य व भत्त्यांमध्ये सुधारणा

दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी अधिक सक्षम पाठबळ मिळावे या उद्देशाने शिष्यवृत्ती दरात भरीव वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सुमारे १२ वर्षांनंतर प्रथमच शिष्यवृत्तीमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना’ या सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ, संस्था किंवा शिक्षण मंडळाला भरावयाचे प्रवेश शुल्क, ट्युशन फी, नोंदणी शुल्क, क्रीडा, युनियन, वाचनालय, मासिक तसेच वैद्यकीय तपासणी यांसारख्या अनिवार्य शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
याशिवाय, शिक्षण शुल्काव्यतिरिक्त मासिक अर्थसहाय्याचे दरही वाढविण्यात आले आहेत. गट १ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर तसेच पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यांना १७०० रुपये (पूर्वी १२००) व अनिवासी विद्यार्थ्यांना ९०० रुपये (पूर्वी ५५०) देण्यात येणार आहेत. गट २ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यांना १२०० रुपये (पूर्वी ८२०) व अनिवासींना ८५० रुपये (पूर्वी ५३०) मिळतील. गट ३ मधील इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही हेच दर लागू राहतील. गट ४ अंतर्गत पदवीतर डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यांना ११०० रुपये (पूर्वी ५७०) व अनिवासींना ८०० रुपये (पूर्वी ३००) देण्यात येणार आहेत.
अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्त्यातही वाढ करण्यात आली असून, गट १, २ आणि ३ साठी दरमहा ३०० रुपये (पूर्वी १००) व गट ४ साठी २२५ रुपये (पूर्वी ७५) निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच, अभ्यास दौऱ्यासाठी वार्षिक १५०० रुपये (पूर्वी ५००) प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत देण्यात येणार असून, प्रकल्प (थेसिस) टंकलेखन, छपाई तसेच पुस्तक भत्ता १८०० रुपये (पूर्वी ६००) करण्यात आला आहे.
या सुधारणांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असून, त्यांच्या उच्च शिक्षणातील सहभाग आणि प्रगतीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.