धावपळीला पूर्णविराम! सहायता निधी मंजुरी आता काही तासांत
रुग्णालयातूनच अर्ज, रुग्णांच्या नातलगांना मोठा दिलासा

गरजू रुग्णांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. नव्या प्रणालीअंतर्गत रुग्णालयामार्फतच ऑनलाइन अर्ज सादर केला जाणार असून, अर्जानंतर साधारणतः ८ तासांच्या आत निधी मंजुरीची कार्यवाही पूर्ण होणार आहे.
या सुधारित प्रक्रियेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना कागदपत्रांसाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, संपूर्ण कार्यवाही अधिक पारदर्शक आणि जलद होण्यास मदत होणार आहे. तसेच, प्रक्रियेत डिजिटल प्रणालीचा अवलंब केल्याने गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही योजना महत्त्वपूर्ण आधार ठरत आहे. चालू आर्थिक वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील ३,८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत हृदयरोग, किडनी, यकृत, कर्करोग, डायलिसिस, अपघात, बोन मॅरो प्रत्यारोपण, गुडघा व हिप रिप्लेसमेंट, नवजात शिशूंचे आजार तसेच भाजलेल्या व विद्युत अपघातग्रस्त रुग्णांसह एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
नवीन प्रक्रियेनुसार, रुग्णालयाकडून ऑनलाइन अर्ज सादर झाल्यानंतर तत्काळ पडताळणी करून मंजुरी दिली जाईल. मंजुरीनंतर निधीतील सुमारे ३० टक्के रक्कम तातडीने संबंधित रुग्णालयाला वितरित केली जाणार असून, उर्वरित रक्कम पुढील कार्यपद्धतीनुसार उपलब्ध करून दिली जाईल.
अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व संपूर्ण प्रक्रियेचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आता रुग्णालयावर सोपविण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवरील ताण कमी होणार आहे.
वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांनी सांगितले की, सुधारित डिजिटल प्रणालीमुळे अर्ज प्रक्रिया अधिक गतिमान झाली असून, अल्पावधीत मंजुरी देणे शक्य झाले आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.