Take a fresh look at your lifestyle.

‘पोक्सो’ अंतर्गत सपोर्ट पर्सन नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले अर्ज ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००१८’ या पत्त्यावर सादर करावेत. तसेच अर्ज depumumbai12@gmail.com या ई-मेलवरही पाठविता येतील. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

सदर पदासाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक असून संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. संगणक ज्ञान (एमएससीआयटी) किंवा तत्सम प्रमाणपत्र अपेक्षित आहे. याशिवाय बालहक्क किंवा बालसंरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांनाही अर्ज करता येणार असून बालगृह अथवा शेल्टर होममधील संबंधित अधिकारीही पात्र ठरू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रारंभी तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून दरवर्षी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. आवश्यकतेनुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (डीसीपीओ) यांच्या शिफारशीवर व जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नियुक्तीचा कालावधी वाढविण्याची तरतूद आहे. वेतन संबंधित नियमांनुसार अदा करण्यात येणार आहे.