निराधार बालकांसाठी आधारवड: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

जळगांव जिल्ह्यातील अनाथ, निराधार, निराश्रित तसेच संकटग्रस्त बालकांना सुरक्षित व कौटुंबिक वातावरण मिळावे यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील पात्र मुला-मुलींना लाभ दिला जात असून, त्यांच्या संगोपनासाठी दरमहा सुमारे ₹2250/- इतकी आर्थिक मदत देण्यात येते.
या अनुदानाच्या माध्यमातून बालकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व वैद्यकीय सुविधा यांची पूर्तता संबंधित कुटुंबामार्फत केली जाते. संस्थात्मक संगोपनाऐवजी कुटुंबाच्या वातावरणात बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यावर या योजनेचा भर आहे.
लाभार्थी पात्रता: अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, एचआयव्हीग्रस्त बालके तसेच संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेली 0 ते 18 वयोगटातील मुले या योजनेस पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे: योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचा अर्ज, बालक व पालकांचे आधारकार्ड, जन्मदाखला/शाळा प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, घरासमोरील फोटो, पासपोर्ट फोटो, पालकांचा मृत्यू दाखला (लागू असल्यास), बँक पासबुक तसेच घटस्फोटित प्रकरणात न्यायालयाचा अहवाल आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.