‘लेक लाडकी योजना’ : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार
मुलींच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी १ लाख १ हजार रुपयांची थेट मदत

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी योजना’ प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
ही योजना १ एप्रिल २०२३ पासून राज्यभर लागू करण्यात आली असून, मुलींचा जन्मदर वाढवणे, बालविवाहाला आळा घालणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींचे शिक्षण प्रोत्साहित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
योजनेनुसार मुलीच्या जन्मावेळी ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
या योजनेसाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुली पात्र असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे.
अर्जासाठी जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशनकार्ड यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक लाभार्थींनी अंगणवाडी सेविका किंवा एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) प्रकल्प कार्यालयात संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.