‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेत ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, तसेच लाभार्थी महिलांकडून करण्यात आलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढविण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
या मुदतवाढीमुळे ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी राहिल्या आहेत, ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, अशा महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता त्या महिलांना आवश्यक दुरुस्ती करून योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा आणि कोणतीही महिला वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. संबंधित महिलांनी ३० एप्रिलपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.