Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षेचे वारे आणणाऱ्या IAS अश्विनी भिडे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरल्या प्रेरणास्थान!

यूपीएससीतल्या यशातून घडला ‘सांगली पॅटर्न’

0

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचीच नव्हे, तर सांगलीत घडलेल्या स्पर्धा परीक्षा चळवळीचीही नव्याने आठवण होत आहे.

मूळ शिराळा तालुक्यातील बिलाशी गावच्या असलेल्या अश्विनी भिडे (पूर्वाश्रमीच्या अश्विनी कुलकर्णी) यांचे कुटुंब नोकरीनिमित्त सांगलीत स्थायिक झाले. त्यांचे शालेय शिक्षण जयसिंगपूर येथे, तर उच्च शिक्षण सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात झाले. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला होता.

मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले. सांगली जिल्ह्यातून यूपीएससीत यश मिळवणाऱ्या पहिल्या महिलांपैकी त्या एक ठरल्या. त्यांच्या या यशामुळे सांगलीत स्पर्धा परीक्षांची चळवळ बळकट झाली.

त्या काळात मार्गदर्शनासाठी स्वतंत्र क्लासेस उपलब्ध नसताना, काही अभ्यासू विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘अभिनव ज्ञानप्रबोधिनी’ हा अभ्यासगट सुरू केला. याच गटाचे पुढे ‘एकलव्य अकादमी’मध्ये रूपांतर झाले. या गटातून अनेक अधिकारी घडले असून, अश्विनी भिडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.

१९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या भिडे यांनी राज्यात विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रशासनात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. आता मुंबईसारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्याने सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्यांच्या यशामुळे आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा निर्माण होत असल्याचे मानले जात आहे.