Take a fresh look at your lifestyle.

शिशुवर्ग ते बारावीपर्यंत वाढीव आर्थिक सहाय्य; शिक्षण, वाचक भत्ता व शुल्कातही दिलासा

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; २३ कोटींच्या निधीला मंजुरी

0

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.

या निर्णयामुळे शिशुवर्ग ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केवळ १०० ते २०० रुपयांदरम्यान असलेली शिष्यवृत्ती आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

नवीन दरानुसार, शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ८०० रुपये (निवासी) व ६०० रुपये (अनिवासी), तर अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना १००० रुपये (निवासी) व ८०० रुपये (अनिवासी) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

याशिवाय अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून भरले जाणार असून, दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दरमहा १५० रुपयांचा वाचक भत्ता देण्यात येईल. तसेच अभ्यास दौऱ्यासाठी दरवर्षी कमाल १५०० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजना ८ ते ३४ वर्षे जुन्या असून, त्यामध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार अधिक लाभ देण्याच्या तरतुदींनाही या निर्णयातून बळ मिळाले आहे.

या योजनेसाठी सुमारे २३ कोटी ११ लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली असून, यामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.