एसटीचा प्रवास आता ‘स्मार्ट’; सवलतधारकांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चे लोकार्पण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘RuPay On-The-Go’ आणि ‘NCMC’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत दिमाखात लोकार्पण करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, संगिता पालकर आणि वर्षा कांबळे यांना प्रातिनिधिक स्वरूपात कार्ड वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
बोगस प्रवाशांना बसणार आळा: हे नवीन स्मार्ट कार्ड थेट आधार क्रमांकाशी संलग्न असणार आहे. त्यामुळे सवलतीचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस प्रवाशांवर वचक ठेवणे आता महामंडळाला सोपे होणार आहे. “राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत ही एक डिजिटल क्रांती आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
प्रवाशांना मिळणारे प्रमुख फायदे: कोणाला मिळणार? विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि सर्व अधिकृत सवलतधारक प्रवाशांना हे कार्ड दिले जाईल.
नोंदणी व वितरण: राज्यातील सर्व एसटी आगार, बसस्थानके आणि सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणी व वितरणाची सोय उपलब्ध आहे.
कार्डची किंमत व टॉप-अप: पहिल्यांदा कार्ड घेताना १९९ रुपये शुल्क आकारले जाईल. किमान १०० रुपयांपासून वॉलेट टॉप-अप करता येईल.
सुटसुटीत रिचार्ज: बसमधील ईटीआयएम मशीन, एसटीचे संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि अधिकृत एजंटमार्फत कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना रांगेत उभे राहण्यापासून सुटका मिळेल आणि प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक पारदर्शकपणे घेता येईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.