Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री कार्यालय ते महापालिकांपर्यंत बदल्यांची धडाकेबाज घोषणा

0

राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बदल्यांची घोषणा करत प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय, वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन तसेच महापालिका प्रशासन अशा अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या बदल्यांमुळे प्रशासनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची बदली मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (आर्थिक सुधारणा) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची बदली मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘पोकरा’ (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) चे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांची कृषी विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, लहु माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. माणिक गुरसाळ यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची बदली वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

या व्यापक बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अधिक वेग, कार्यक्षमता आणि समन्वय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.