पशुपालकांसाठी ‘महापशुधन वार्ता’चा लाभ; डिजिटल ई-मासिक ठरतंय ज्ञानाचा खजिना
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील योजना, आधुनिक तंत्रज्ञान, यशोगाथा आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती या मासिकातून उपलब्ध करून दिली जाते.
या मासिकाची संकल्पना पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांची असून, मे २०२५ मध्ये पहिला अंक प्रकाशित झाला होता. आतापर्यंत या मासिकाचे ११ अंक प्रसिद्ध झाले आहेत. राज्यातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी कथा, शेळीपालन, कुक्कुटपालन, बायोफ्लॉक मत्स्यपालन, गो-आधारित शेती तसेच लसीकरण मोहिमा यांसारख्या विविध विषयांचा समावेश या मासिकात केला जातो.
मार्च २०२६ च्या अकराव्या अंकात परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय महापशुधन एक्स्पोची माहिती, आत्मनिर्भर गोशाळा, नैसर्गिक शेती, लडाखमधील पशुधनासाठी महाराष्ट्राची मदत आणि नंदुरबारमधील दुग्धविकास यांसारख्या विषयांवर विशेष लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.

शासनाच्या योजना, आधुनिक तंत्रज्ञान व यशोगाथांची एकाच ठिकाणी माहिती; पशुपालकांना मार्गदर्शनाची नवी दिशा
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या मासिकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून हे मासिक पशुपालकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. तर सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी हे मासिक ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त असून सर्वांनी नियमित वाचन करावे, असे आवाहन केले आहे.
हे ई-मासिक पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महाविस्तार अॅपवर मोफत उपलब्ध असून, इच्छुकांनी ते डाउनलोड करून लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीपकुमार देवरे यांनी केले आहे.
‘महापशुधन वार्ता’मुळे पशुपालकांना आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, उत्पन्नवाढीसाठी नवी दिशा मिळत आहे.