Take a fresh look at your lifestyle.

तृतीयपंथीयांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी! ४५% अनुदानासह १२ लाखांपर्यंत मिळणार कर्ज

0

तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची पाऊले उचलली असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

दि. १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या स्वावलंबनाला चालना मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास मदत होणार आहे.

 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ₹२५ हजार ते ₹२ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. निधी रचनेनुसार ४५ टक्के शासन अनुदान, ५० टक्के बँक कर्ज आणि ५ टक्के लाभार्थी हिस्सा असा समावेश आहे. विशेष म्हणजे, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना ३० टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळणार असून, या योजनेसाठी जामीनदार किंवा तारणाची आवश्यकता नाही.

तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बीज भांडवल योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून, तो/ती महाराष्ट्राचा किमान १० वर्षांचा रहिवासी असावा. तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत.