Take a fresh look at your lifestyle.

एसटीमध्ये मेगा भरती: १७,७४२ पदे कंत्राटी पद्धतीने भरणार

0

राज्य परिवहन महामंडळात (एसटी) मोठ्या प्रमाणावर मेगा भरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तब्बल १७,७४२ चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटीच्या ताफ्यात लवकरच समाविष्ट होणाऱ्या सुमारे ८,३०० नव्या बसेस चालवण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. नियमित भरतीसाठी अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असला, तरी तोपर्यंत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी भरती आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत चालक-वाहकांच्या अडचणी, आगारस्तरावरील निर्णयप्रक्रिया आणि शिस्तभंग कारवाई यामध्ये पारदर्शकता राखण्याचे निर्देश देण्यात आले. एसटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्या एसटीच्या ताफ्यात १४ हजारांहून अधिक बसेस कार्यरत असून, पुढील वर्षभरात आणखी ८,३०० बसेस समाविष्ट होणार आहेत. त्यापैकी ३ हजार बसेस महामंडळाच्या ताब्यात आल्या असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

याशिवाय, मुंबईसाठी ३० स्लीपिंग कोच आणि १७० वोल्वो बसेस लवकरच दाखल होणार असल्याने प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, प्रवाशांसाठी विविध सवलतींची अंमलबजावणीही सुरू आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवास आणि आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.