शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ लागू
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 7.5 एच.पी. पर्यंतच्या कृषी पंपांना पूर्णतः मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असून, वाढत्या वीजबिलाच्या ताणातून त्यांची मोठी सुटका होणार आहे. बदलत्या हवामानामुळे आणि अनियमित पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
7.5 एच.पी. पर्यंतच्या सर्व कृषी पंपांना मोफत वीज
योजना कालावधी : एप्रिल 2024 ते मार्च 2029 (5 वर्षे)
दरवर्षी सुमारे ₹14,760 कोटींचा निधी खर्च
महावितरणमार्फत थेट अंमलबजावणी
वीजबिल पूर्णतः माफ:- या योजनेमुळे शेती खर्चात मोठी बचत होणार असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे.
विशेष बाब :- शासनाने यासोबतच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ धोरणालाही गती देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भविष्यात ऊर्जेचा पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहे. एकूणच, ‘मोफत वीज’ निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळणार आहे.