Take a fresh look at your lifestyle.

सार्वजनिक सुट्टीतही नोंदणी कार्यालये सुरू;आर्थिक वर्षाअखेरीची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

0

आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्याने मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई शहर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याअंतर्गत २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या दिवशी सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर यांच्या अधिपत्याखालील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ ते १५ ही सर्व कार्यालये नियमित शासकीय कामकाजासाठी सुरू राहणार आहेत.

आर्थिक वर्षाच्या शेवटी दस्तनोंदणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कार्यालयांमध्ये होणारी गर्दी कमी करणे आणि नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सह जिल्हा निबंधक भरत गरुड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि नियोजनपूर्वक आपल्या व्यवहारांची पूर्तता करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.