जमीन वादांवर नियंत्रण आणण्याचा उद्देश; राज्यात ‘पथदर्शी’ प्रकल्प सुरु
जमिनीच्या नकाशे आणि 7/12 अधिकार अभिलेखांमधील विसंगती दूर करून जमीनविषयक वाद कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या प्रारंभीच्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील गोळेगाव खुर्द, गोळेगाव बुद्रूक, पाचदेवळी, करंजी आणि भानखेडा या पाच गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जमिनीच्या पोटहिस्स्यांची अचूक मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
या उपक्रमामुळे जमिनीच्या हद्दी, क्षेत्रफळ आणि मालकी संदर्भातील तफावत दूर होण्यास मदत होणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमीन वादांवरही आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १८ तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन पुढील टप्प्यात इतर भागातही विस्तार केला जाणार आहे.