पशुपालकांसाठी महत्त्वाचे आवाहन : १२ अंकी इअर टॅग बंधनकारक
जळगाव- राज्यातील पशुधनाची अचूक ओळख व संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रत्येक जनावराला १२ अंकी ‘इअर टॅग’ लावणे आता बंधनकारक करण्यात आले असून, त्यास आधार व मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.

इअर टॅग का आवश्यक?- इअर टॅगमुळे जनावरांची ओळख, आरोग्य नोंदी, लसीकरण व उपचार यांचे व्यवस्थापन सुलभ होते. तसेच नैसर्गिक आपत्ती, रोगराई किंवा चोरीच्या घटनांमध्ये जनावरांचा मागोवा घेणे शक्य होते.
टॅग नसेल तर काय नुकसान?- इअर टॅग नसल्यास पशुपालकांना विविध शासकीय सुविधा व योजनांपासून वंचित राहावे लागू शकते. यात उपचार, कृत्रिम रेतन, लसीकरण, कायदेशीर खरेदी-विक्री, बँक कर्ज, विमा संरक्षण आणि इतर वैयक्तिक लाभांचा समावेश आहे.
नोंदणी कशी करावी?- जनावराला इअर टॅग लावा, आधार व मोबाईल क्रमांकाशी लिंक करा. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे की, वेळेत नोंदणी केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येईल आणि विविध योजनांचा लाभ सहज मिळू शकेल.
“पशुधनाची ओळख – प्रगतीची पाऊलवाट” या घोषवाक्याखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सर्व पशुपालकांनी सहभागी होऊन आजच नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.